मी डोलकर दर्याचा राज़ा (वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा)

वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा                    - कोरस

मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राज़ा
घर पान्यावरी बंदराला करतो ये जा                  ।। धृ ।।


आय बापाची लाराची लेक मी लारी
चोली पिवली गो नेसलय अंजिरी सारी
माज्या केसान गो मालीला फुलैला चाफा
वास परमाळता वार्‍यान घेतय झेपा
नथ नाकान साजिरवानी
गला भरुन सोन्याचे मनी
कोलीवार्‍याची मी गो रानी
रात पुनवेला नाचून करतय मौजा                     ।। १ ।।

या गो दर्याचा दरारा मोठा
कवा पान्यावरी उठतान डोंगर लाटा
कवा उदानवारा शिराला येतय फारु
कवा पान्यातूनी आभाला भिरतंय तारु
वाट बगून झुरते पिरती
मंग दर्याला येते भरती
जाते पान्यान भिजून धरती
येते भेटाया तसाच भरतार माजा                      ।। २ ।।

भल्या सकालला आभाल झुकतंय हे खाली
सोनं चमचमतंय दर्याला चढते लाली
आमी पान्यामंदी रापण टाकतो जाली 
धन दर्याचं लुटून भरातो डाली
रात पुनवेचं चांदन प्याली
कशी चांदीची मासोली झाली
माज्या जाल्यात होऊन आली
नेतो बाजारा भरुन म्हावरा ताजा                     ।। ३ ।।

शब्द : शांत शेळके
संगीत : हृदयनाथ मंगेशकर
स्वर : लता मंगेशकर व हेमंत कुमार 

Comments

Popular posts from this blog

माझिया मना ... - ऋतु हिरवा

जीव रंगला ... - जोगवा

मेंदीच्या पानावर ... - सुरेश भट